Ad code

Latest

6/recent/ticker-posts

पावसाळ्यात या रानभाज्या खाल्ल्याच पाहिजेत!! तुम्हांला यातल्या किती भाज्या माहीत आहेत? Pavasali ranbhajya

पावसाळ्यात या रानभाज्या खाल्ल्याच पाहिजेत!! तुम्हांला यातल्या किती भाज्या माहीत आहेत?

आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक, त्रिदोषहारक रानभाज्यांचे अनेक फायदे आहेत. पण यातल्या अनेक भाज्या आहेत ज्या आपण कधी खाल्ल्याच नाहीत व त्या आपल्याला ओळखूच येत नाहीत. रानभाज्या खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत कारण या कुठल्याही खते न वापरता जमिनीतून उगवत असतात.


 
पाऊस सुरु झाला की रानात माळावर रानभाज्या उगवायला सुरुवात होते.  या रानभाज्या रानोमाळी कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. सध्याच्या ऑरगॅनिक फूडच्या जमान्यात वर्षातून एकदाच येणारा रानमेवा पौष्टिक तत्त्वांनी भरलेल्या आरोग्य वर्धक आणि बहुगुणी असतात. यात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, सॅपोजेनिन, सॅपोनिन, सोडियम,पोटॅशियम,कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. म्हणजे खऱ्या अर्थाने ऑरगॅनिक फूड असतो.

शहरातील लोकांना या भाज्यांची ओळख नसली तरी गावच्या व आदिवासी लोकांना याची माहिती असते, या भाज्या कुठे मिळतात त्या कश्या बनवायच्या हे त्यांना चांगलंच माहीत असते. तुम्ही हे पहिलेच असेलच की काही महिला भर पावसात या भाज्या घेऊन बाजारात येतात. यात पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश असतो. या भाज्या कोणतंही खत किंवा कीटकनाशकांचा वापर न करता आणि कोणतीही लागवड न करता आपोआपच उगवतात. अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे देवाने दिलेले वरदानच.

या प्रकारच्या रानभाज्या गावच्या भागात, माळरानावर, जंगलात अश्या ठिकाणी आढळतात. अश्या भाज्या ग्रामीण व आदिवासी लोक शहरी भागात येऊन या भाज्या विकततात व त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळतो. कधीही न मिळणाऱ्या भाज्या शहरात विकायला आल्यावर लोक उत्साहाने या भाज्या घेतात कारण या पुर्णतः नैसर्गिक रित्या आलेल्या असतात व त्यात पोषक तत्व देखील भरपूर प्रमाणात असते.

शहरप्रमाणेच गावातील देखील अनेकांना या भाजांची नावे माहित नाहीत. त्यामुळे प्रत्येकालाच या भाज्या घेता येत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही रानभाजांची नावे आणि त्यांची थोडक्यात माहिती देणार आहोत.
चला तर पाहूया या रानभाज्या कोणत्या आहेत.

1) - अळू 

जेवणात अळू असलं की दुसरं काही नकोच वाटतं. अळूच फदफद हा अनेकांचा जीव की प्राण आहे. पाऊस सुरू झाला की आठवडाभरातच अनेक ठिकाणी रानअळू आपले डोकं वर काढते. व काही दिवसातच सगळीकडे अळूचे रानच तयार होते. अळू भाजी मध्ये दोन-चार प्रकार आहेत. काही लोक अळूचे कांदे लावून घरीच त्यांना वाढवतात. अळू भाजीच्या पानांना खाज सुटते, ते व्यवस्तीत तोडून त्याला स्वच्छ धुवून त्याला तोड कोकम किंवा आंबट लावून त्याची खाज कमी केली जाते, अळूचे फदफदे, अळूची वडी यांची चव तर तुम्हाला सांगायलाच नको.

 


आषाढापासून ते अगदी पक्षपंधरवडा होऊन दिवाळी होईपर्यंत हे रानअळू टिकून असतं. पावसाळ्यानंतर पाण्याच्या ठिकाणी म्हणजे विहिरीजवळ तलावाजवळ व नदीजवळ हे रानअळू जिवंत राहतं. अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे असतात.

2) - कुलुची भाजी

पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या आवर्जून खाव्यात भरपूर औषधीयुक्त असतात. पावसाळा सुरू झाला की पहिल्या सरीनंतरच रानात सर्वत्र कुलुची भाजी दिसू लागते. पाऊस पडल्यानंतर काही दिवसातच ही भाजी तयार होत असल्याने ही भाजी बाजारात विकायला येते. या भाजीला फोडशी, कुलु किंवा काल्ला या नावाने हि ओळखली जाते.
कुळूची भाजी म्हणजे एक प्रकारचे गवतच असते. ही भाजी कांद्याच्या पातीप्रमाणे दिसायला असते, व ती फक्त पावसाळ्यातच मिळते. इतर मिळणाऱ्या पावसाळी भाज्यांप्रमाणे हि चविला खूप चविष्ट असते. हि भाजी शाकाहारी व मांसाहारी ह्या दोन्ही प्रकारात करता येते.

3) - काटलं/कर्टुलं/कंटोळं


काटलं ही एक फळभाजी असून ती पावसाळ्यात उगवते. पावसाळ्यात झाडीच्या ठिकाणी याची वेल लागते, तिला पिवळ्या रंगाची फुले असतात त्यातूनच हे कटल्याचे फळ येते. ही भाजी कारल्यासारखी दिसते पन ती करल्यासारखी जास्त कडू नसते. जश्या प्रकारे आपण कारल्याची भाजी करतो तशीच या फळाची भाजी केली जाते.
कर्टोलीची वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम घाट व पश्‍चिम महाराष्ट्र परिसरात जास्त प्रमाणात आढळतात. कर्टोली भाजीला जून ते ऑगस्ट महिन्यात जास्त भर असतो. कर्टोली  हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.

4) - नळीची भाजी

नळीची भाजी  ही वनस्पती तळी व तलावांच्या शेजारी, काठांवर, पाणथळ, ओलसर जमिनीवर, दलदलीच्या ठिकाणी वाढलेली आढळते. महाराष्ट्रात ही वनस्पती सर्वत्र आढळते. ही वनस्पती उष्ण कटिबंधीय आणि अर्थ-जलीय प्रकारची आहे. ही वेलवर्गीय वनस्पती पाण्यातही आणि जमिनीवरही वाढते म्हणून हिला अर्थ जलीय वनस्पती असे म्हणतात. नागिणीच्या उपचारात ही वनस्पती वापरली जाते. हिची वेल पसरत जाते, तसेच ही वनस्पती बहुगुनिय आहे याचा उपयोगाने अशक्तपणा, कावीळ, डोळ्यांचे आजार,  श्वासनलिका दाह-वयकृतविकारात या वनस्पतीचा वापर करतात.

5) - रोवणा अळंबी


जून महिन्यात पाऊस सुरु झाल्यानंतर साधारण महिना भराने आदिवासी लोक बाजारात अळंबी विकायला येतात. रानावनात नैसर्गिकरीत्या उगवून आलेल्या मशरुम्स ला इथं अळमी असं म्हणतात. पण मशरुम्स आणि अळमी यांच्या चवीत खूप फरक आहे, ही भाजी जास्त करून कोकण पट्यात येते येथील लोक या भाजीवर तुटून पडतात म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, कारण याची चव खूपच उत्कृष्ट असते.
अळमीचा पहिला बहर बाजारात येताच लोकं त्यावर तुटून पडतात. बाजारात विकायला आणलेली अळंबी प्रचंड महाग असतात पण पैशांची पर्वा न करता अळंबी खरेदीला झुंबड उडते. कारण याच्या चवीपुढे चिकन मटण देखील फिके पडते.

6) - कुरडू


किरडूची भाजी रान माळावर व डोंगराळ भागात मिळते, ही दिसायला हिरव्या मटासारखी असून चवीला पण तशीच लागते.  पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रानोमाळ कुरडू जातीची पालेभाजी दिसू लागते. कुरडू पालेभाजीच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते.

7) - टाकळयाची भाजी


पावसाळी रानभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसणारी भाजी म्हणजे टाकळा. पावसाळ्यात अत्र तत्र सर्वत्र टाकळ्याचं राज्य असतं. पावसात येणाऱ्या रानभाज्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात यामध्ये मोठ्याप्रमाणात मिळणारी भाजी म्हणजे टाकाळा याला तरोटा पण म्हणतात या भाजीच्या कोवळ्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. टाकळ्याला येणारा उग्र वास आणि हलकी तुरट चव यामुळे ही भाजी जास्त लोक खात नाहीत पण टाकळा गुणकारी असल्यामुळे काही माणसं मात्र त्याचा जेवणात भाजीसाठी उपयोग करतात. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो. त्याचबरोबर ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकारही या भाजीच्या सेवनाने कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो. टाकळ्याची भाजी पचायला हलकी, तिखट, तुरट, पित्तकर आहे व मलसारक आहे.

8) - शेवळा

शेवळा हा कोकण व पश्‍चिम महाराष्ट्र या जंगलात आढळते. शेवळा म्हणजे सुरणाच्या फुलांची दांडी. पावसाळा सुरू झाला की जमिनीत असलेल्या सुरणाच्या कांद्याला उंच दांडी असलेला फुलोरा येतो. भाजी करण्यासाठी फुलोऱ्याची संपूर्ण दांडी वापरली जाते. शेवळ्यात भरपूर प्रोटीन्स असतात. याच्या ताज्या दांडय़ाची भाजी ताबडतोब करावी लागते. ही भाजी झाडी झुडपामध्ये डोंगराळ भागात आढळते तसेच रानात ही भाजी आढळते.

9) - दिंडा

दिंडा भाजी पावसाळा संपला की मृत अवस्थेत जाते आणि पावसाळ्याच्या पहिल्या सरीबरोबर त्याला नवे कोंब फुटू लागतात. या कोंबाची भाजी केली जाते ही भाजी चवीला थोडीफार शेवग्याच्या शेंगे सारखी लागते, तशी दिंडाची भाजी खास प्रसिद्ध आहे. ही भाजी जास्त लोक खात नाहीत पण गावाकडची लोक मात्र या भाजीचा खूप आस्वाद घेतात.

10) - अंबाडी

आंबट चवीची अंबाडीची भाजी ही चविष्ट तर असतेच शिवाय अनेक पोषकतत्त्वांनीही परिपूर्ण असते. अंबाड्याच्या भाजीत आयर्न (लोह), व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-B6, folate, कॅल्शियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट यासारखे अनेक पोषकतत्वे भरपूर प्रमाणात असतात. ही भाजी पावसाळ्याच्या दिवसात बाजारात भरपूर प्रमाणात मिळते, चवीला ही आंबट असते तरीही लोक आवर्जून ही भाजी खरेदी करून खातात. या वनस्पतीची उंची 1.5 ते 2 मीटर इतकी वाढते.

11) - बांबू

बांबु ही अतिशय महत्वाची गवतवर्गीय वनस्पती आहे. बांबुच्या हजारो प्रजाती जगभरात आहेत. बांबुच्या कोवळ्या कोंबांची भाजी केली जाते. आपल्याकडे मिळणा-या सर्वच बांबुच्या कोंबांची भाजी केली जात नाही कारण बहुतांश प्रजातींमध्ये सायनाईडचा अंश असतो. बांबुच्या कोवळ्या कोंबांची भाजी निसंशय बनविता येते व खाण्यास सुरक्षित तर आहेच सोबत आरोग्यासाठी अनेक फायदे देणारी देखील ही भाजी आहे.
बांबूचा अगदी मांसल, मऊ कोंब भाजीसाठी वापरतात. बाळंतपणात नाळ पडून गेल्यानंतर गर्भाशयाची पूर्ण शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतिणीला देतात. तसेच स्त्रियांचा विटाळ साफ होत नसल्यास ही भाजी गर्भोत्तेजक म्हणून द्यावी, यामुळे मासिक

12) - भारंगी

भारंगी भाजी खाण्याचे अनेक आरोग्यादायी फायदे आहेत, ही भाजी उगवल्यानंतर याची पाने कोवळी असतानाच तोडली जाते व त्याची भाजी केली जाते. तसेच याच्या फुलांची भाजी देखील उत्कृष्ट लागते. भारंगच्या पानांच्या कडा करवतीसारख्या दातांसारख्या असतात. भारंगाची सुकी भाजी विशेष लोकप्रिय आहे.
भारंगी हे दाहक, पाचक,  शमन, कफनाशक, आहे. खोकला, धाप लागणे, सूज, व्रण, जंत, जळजळ, ताप इत्यादी गोष्टी कमी करण्यात भारंगी असरदार आहे.

13) - अकुर

पावसाळा सुरू झाला की हिरवट, काळपट, तपकिरी रंगाच्या वेली आपली मान वरती डोकवायला लागतात. यात नीट बघितल्यास अकुरच्या वेली दिसतात. इतर पावसाळी रानभाज्यांप्रमाणे अकुर ही पण एक रानभाजी आहे. अकुराच्या वेलीचा कोवळा भाग घेऊन त्याची भाजी केली जाते.

14) - उळशीचा मोहोर

पावसाळा सुरू झाला की निरनिराळ्या रानभाज्या यायला सुरुवात होते. साधराणपणे ऑगस्ट महिन्यात उळशीचा मोहोर येतो. या मोहराची भाजी बनवतात. डोंगराळ भागामध्ये येणारी ही मोहराची भाजी त्यातलीच एक अत्यंत दुर्मिळ अशी भाजी आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर उळशीच्या वेलीला मोहोर फुटायला सुरवात होते. नंतर हाच मोहोर काढून त्याची भाजी केली जाते. अगदी माशाच्या अंड्यासारखी ही भाजी दिसते म्हणून तिला गाबूलीची भाजीही म्हणतात.

मंडळी, याशिवायही अनेक अश्या रानभाज्या आहेत ज्या फक्त पावसाळ्यात पाहायला व खायला मिळतात. तसेच या रानभाज्यांचे औषधीय गुण देखील खूप आहेत.

या सर्व रानभाज्या करण्यासाठी अगदी सोप्या आणि खायला रुचकर असतात. वर सांगितल्या प्रमाणे नैसर्गिक पद्धतीने उगवल्याने त्या आरोग्यासही चांगल्या असतात. तुम्ही कोणकोणत्या रानभाज्या खाल्या आहेत ते कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा सोबतच आमचा हा लेख तुमच्या मित्रांसोबत व social media साईट वर शेअर करायला विसरू नका.

( वरील भाजी  विकत घेण्या व खाण्या अगोदर त्या भाजीची ओळख करूनच ती भाजी घ्या )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site