Ad code

Latest

6/recent/ticker-posts

"होता जिवा म्हणून वाचला शिवा" वीर जिवा महाले यांची यशोगाथा Jiva Mahale information in marathi

गोष्ट वीर जिवा महाले यांच्या शौर्यांची Vir Jiva Mahale information 


शिवरायांनी आपल्या अनेक वीर व निडर मावळ्यांच्या मदतीने प्रचंड मोठे हिंदवी स्वराज्य निर्माण केले, परंतु स्वराज्य निर्माण करताना अनेक असे मौल्यवान रत्न गमवावे लागले. अनेक अश्या वीर मर्द मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले आहे. यातच एक महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची आहे.


जिवाजी महाले हे एक वीर लढवय्ये होतेच या व्यतिरिक्त ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षकही होते, "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण यांच्या वरूनच आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा प्रतापगडावर अफजलखान यांच्याशी भेट घ्यायला गेले तेव्हा यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवले होते. या प्रसंगी जिवाजी महालाचे वय २५ च्या घरात असावे असा कयास काढण्यात येतो.

जीवा महाला यांचे बालपण – Jiva Mahala History in Marathi

जीवामहालाचे मूळ गाव वाई तालुक्यातील कोंडवली बुद्रुक होय. जीवा महाले यांचे वडील हे शहाजी महाराजांच्या सेवेत होते. एका युद्धप्रसंगात त्यांना त्यांचा पाय गमवावा लागला होता. जीवा महालाच्या रक्तातच शौर्य पराक्रम आणि कुटुंबात स्वामीनिष्ठा होती, ज्याचे बाळकडू लहानपणापासून त्यांना मिळाले होते.

जिवाजी महाले यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1665 (अश्विन शुद्ध 6 शके 1557) रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी मु. पो. कोंडवली, जि. सातारा येथील संकपाळ कुटुंबात झाला. जीवाजींच्या आईवडिलांच्या निधनानंतर जिवाजी आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ देव महाले यानीं केला. तेव्हापासून त्यांचे आडनाव महाले पडले. बालपणापासून त्या काळी आलेल्या धकाधकीच्या संकटातून लढायांच्या काळात मुलांना लढाईचे प्रशिक्षण दिले जायचे. जिवाजीसुद्धा साता-याच्या तालमीतला लाल मातीत मेहनत करणारा पठ्ठा होऊ लागला. जोर, बैठका, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे याचे शिक्षण त्याला मिळाले होते. मातीत कुस्त्या खेळणे या प्रशिक्षणात तो चांगला पारंगत झाला. उंच उड्या मारण्यात तर तो निष्णात होता. उड्डाण मारल्यावर हवेतच शत्रूच्या शरीराचे दोन तुकडे करत असे. याशिवाय ते पहलवाणीत ही तरबेज होते. जिवाजी महाला यांचे वडील पहिलवान होते, त्यांनीच जिवाजी महाले यांना पहिलवानीचे धडे दिले होते.

जिवाजी महाले आणि शिवरायांची पहिली भेट

जिवा महाला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली भेट उंबरठ या गावी झाली होती, उंबरठ हे तसे सुभेदार तानाजी यांच गाव आहे. या गावात तानाजी रावांचा चार चौकी वाडा होता, एकदा गावात जत्रा असल्याने कुस्तीचा कार्यक्रम होता, आजची कुस्ती लखु बेरड या नावाजलेल्या पैलवणाची होती त्याच्या विरुद्ध लढणार होता भिकाजी ढेरे. ही कुस्ती पाहायला खुद्द शिवाजी महाराज येणार होते, त्यामुळे महाराजांना बघायला बरीच मंडळी देखील जमली होती. मैदान खचाखच भरलं होत, सुरुवातीला लहान मोठ्या कुस्त्यांना सुरुवात झाली तेवढ्यात शिवाजी महाराजांचे अश्वदल मैदानात दाखल झालं.

 
राजे आपल्या कृष्णा घोडीवरून खाली उतरले काय तो राजांचा रुबाब सर्व मैदानात राजांचा जयजयकार घुमू लागला. तानाजी राव राज्यांच्या स्वागतासाठी वाटेतच थांबले होते, महाराजांनी तानाजी रावांना आलिंगन दिले आणि तेवढ्यात खबर आली की बाजी पासलकर यांच्या गावी नरभक्षी वाघाने हल्ला केला आहे या वाघाशी झुंजता लखु बेरड याच्या पायाला जखम झाली असल्याने तो कुस्ती लढू शकत नव्हता. ही कुस्ती पहायला शिवाजी महाराज आले होते. भिकाजी ढेरे याच्याशी लढणार कोण म्हणून तानाजी राव यांनी सर्व मंडळी ना आवाहन केले, की या गावात असा कोण आहे का जो या भिकाजी ढेरे या पैलवणाशी दोन हात करेल असेल तर समोर या. सर्व गाव शांत होत तेवढ्यात गर्दीतून एक दौलदर रांगडा गडी मैदानाच्या दिशेने येत होता. जमा झालेला जण समुदाय त्याला रिंगणात जायला जागा करून देत होता.
रिंगणात येऊन महाराजाना वंदन करून कुस्ती चालू झाली, आणि या कुस्तीत या रांगड्या गड्याने भिकाजी ढेरे याला अत्यंत चपळाईने मात दिली. या कुस्तीत जिंकणाऱ्याला 10 शेर वजनाचा सोन्याचं कड देण्यात आलं. तानाजी रावांनी शिवाजी महाराजांना या रांगड्या गाड्याची जिवा महाले म्हणून ओळख करून दिली. जिवा महाला कुस्तीत खेळण्यात दांडपट्टा चालवण्यात तरबेज होता, शिवरायांना जेव्हा जिवाजी महालेविषयी समजले तेव्हा त्यांनी जिवाजीला खास सैन्यात दाखल करून घेतले. तरणाबांड-भरदार मान-जाड पल्लेदार मिशा, सरळ नाक, भलेमोठे कपाळ आणि भेदक नजर पाहताच शत्रूलाही कापरे भरत होते. शरीराने वाघ-सिंह ज्याप्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी धावतात त्याप्रमाणेच जिवा महाले अतिशय चपळ होता. महाराजांना ही आपल्या सैन्यात असेच मावळे हवे होते त्यांनी जिवा महाले याला आपल्या सैन्यात आपला अंगरक्षक म्हणून निवड केली.


होता जिवा म्हणून वाचला शिवा


जेव्हा अफजल खान शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आपल्यासोबत हजारो सैनिक, घोडदळ-पायदळ घेऊन महाराष्‍ट्रात दाखल झाला. तेव्हा शिवराय रायगडावर होते. तेव्हा रायगड सोडून शिवरायांनी प्रतापगडावर जाण्याचा विचार केला. कारण प्रतापगड सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय योग्य किल्ला होता प्रतापगड हा डोंगरी किल्ला असल्याने एकावेळी एकच व्यक्ती तेथे जाऊ शकत होती. आजूबाजूचा परिसर संपूर्ण जंगलाने वेढलेला, त्यात हिंस्र पशू-प्राणी, जंगली श्वापदांचा वावर असल्याने प्रतापगडावर जाणे खूपच अवघड होते. शिवाजी महाराज प्रतापगडावर पोहोचल्याचे वृत्त समजताच अफजल खान खूप चिडला. त्याने महाराष्ट्रातील अनेक हिंदू देवदेवतांची देवळे पाडण्यास सुरुवात केली. या कारणाने तरी शिवाजीराजे खाली येतील असा त्याचा कयास होता, पण  शिवरायांना अफजल खानाची ही नीती माहिती होती. एवढे करूनही शिवराय खाली न आलेले पाहून त्याने सेवकामार्फत शिवाजीराजांना भेटण्याचा निरोप पाठवला, यात त्यांनी लिहले तुम्ही माझ्या मुलांसारखे मला भेटण्यास या, आमचे किल्ले परत द्या, मी तुम्हाला बादशहाकडून जहागिरी देतो असा निरोप त्याने भेट पत्रात लिहला. त्यावर शिवरायांनी त्याला संदेश पाठवला की मला तुम्हाला भेटायची भीती वाटते, तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी या असा संदेश अफजल खानला भेटताच अफजल खान खूपच खुश झाला.

भेटीची तारीख आणि वेळ ठरली. भेट कारारात हे ठरलं की शामियान्यात या दोघांव्यतिरिक्त त्यांचा वकील असेल. भेटीचा दिवस उजाडला अफजल खानाची भेट घेण्यासाठी महाराजांनी अंगात चिलखत घालून वरती अंगरखा चढवला डोक्यात जिरेटोप घालून जिवा महाले व वकील यांच्या सोबत भेटीसाठी निघाले. महाराजांनी आपली काही माणसे सोबत घेऊन निघाले सगळ्यांना कामे वाटून दिली. प्रतापगडाच्या पायथ्याशी सुंदर शामियाना उभारण्यात आला होता. अफजल खानाचे मनोराज्य चालू होते. महाराज गडाच्या पाय-या उतरत असताना, थोड्या अंतरावर सय्यद बंडा उभा होता. जिवाजींनी सय्यद बंडाविषयीची माहिती महाराजांना दिली. महाराजांनी वकिलामार्फत निरोप पाठवून सय्यद बंडास दूर करण्यास सागितले. अफजल खान त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शामियान्यात होते. अफजल खानाने शिवरायांना दोन्ही हात हवेत पसरून आलिंगन दिले आणि ज्याची अपेक्षा होती तेच घडले. खानाने महाराजांची मान डाव्या कुशीत दाबून ठेवली आणि उजव्या हाताने कट्यारीने पाठीवर वार केला. अंगात चिलखत असल्याने कट्यार घसरत गेली. खानाला हे समजताच त्याने दुसरा हल्ला करण्याआधीच शिवरायांनी क्षणाचाही विलंब न लावता अस्तन्यात लपवलेला बिचवा काढून खानाच्या पोटात खुपसला व वाघ नकांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. खान ओरडला तसा शिवरायांवर खानाच्या वकिलाने हल्ला चढवला. शिवाजीराजांनी कृष्णाजी कुलकर्णी याचेही तलवारीने दोन तुकडे केले. इकडे बाहेर असलेला सय्यद बंडा गोंधळाचा आवाज ऐकून धावत आत आला आणि महाराजांवर हल्ला करणार इतक्यात जिवा महालेने अत्यंत चपळाईने सय्यद बंडाचा समशेर असलेला हात वरच्यावर हवेत कापला व त्याला ठार केले. जिवा महाला च्या या चपळाईनेच व स्वामी निष्ठेने त्याने शिवाजी महाराजांचे जीव वाचवले. तेव्हापासूनच ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ हा वाक्प्रचार रूढ झाला.

जीवा महाला समाधी: Jiva Mahala Samadhi

जीवा माहाले यांची समाधी रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी आंबवडे गावी वीर कान्होजी जेधे यांच्या समाधी स्थळाजवळ आहे. जीवा महाले यांनी शिवाजी महाराजांचे प्राण वाचवलेची ही घटना तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी घडलेली आहे. ज्या तऱ्हेने इतिहासाच्या पानांमध्ये प्रतापगड येथील अफजलखानाची आणि शिवरायांची भेट अजरामर झाली आहे अगदी त्याच पद्धतीने या लढाईतील जीवा महालाचे अद्वितीय शौर्य देखील सगळ्यांच्या स्मरणात कायमचे कोरल्या गेले आहे ती आजही अजरामर आहे.


तुम्हाला आमची माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जवळ जीवा महाला बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site